There was an error in this gadget

Tuesday, December 23, 2008

Sarangkhed....1600 Horse Power

महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या सारंगखेड या आदिवासी गावात दरवर्षी होत असलेल्या घोडेबाजारात फक्त 15 दिवसांत तब्बल 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल होते. राजापासून रंकापर्यंत सर्वच जण उत्साहानं यात भाग घेतात. विस्तीर्ण अशा पसरलेल्या तापी नदीच्या काठावर सारंगखेड हे गाव वसलंय. गेल्या 400 वर्षांपासून इथे घोड्यांचा बाजार भरतो, असं म्हणतात. शिवाजी महाराज सूरतेला जाण्याआधी सारंगखेडला आले होते आणि त्यांनी आपले घोडे इथे बदलून घेतले होते, असंही म्हटलं जातं. दरवर्षी दत्त जयंतीला हा बाजार भरतो. सारंगी बनण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात मोठमोठे वादक आणि सरदार यायचे. मग त्यांना विकण्यासाठी इथे घोड्यांचा बाजारही भरू लागला, असं म्हणतात. आज शेकडो वर्षानंतरही शासकीय मदत नाही, कोणीही आयोजक नाही, जाहीरात नाही की निमंत्रण नाही. पण हा बाजार ठरल्यादिवशी भरतो आणि देशभरातले हजारो लोक इथे हजर होतात. तापी नदीच्या काठावर भरलेल्या या बाजारात राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात अशा अनेक राज्यांतले व्यापारी इथे घोडे घेऊन येतात. सारंगखेडचे संस्थानिक विक्रांत रावल यांनी या घोडेबाजाराविषयी अधिक माहिती दिली. विक्रांत रावल हे घोड्यांचा व्यापार करत नाही तर एक वारसा म्हणून घोडे बाळगतात. मारवाड, काठेवाडी, पंजाब अशा अस्सल भारतीय ' नस्ल ' चे आणि नुकरा, सफेद, तेल्या, गोमेद, काळा, संजाब अशा अनेक रंगाचे अक्षरश: हजारो घोडे इथे आहेत. इथे देशभरातून घोडे येतात. कोट्यवधींची उलाढाल होते. सुरुवातीला तर शासनाच्या पशूसंवर्धन खात्यातर्फे अनंत अडचणी आणण्याचा प्रयत्न झाला. कुणीतरी परदेशातून आयात केलेल्या घोड्याला पुण्यात एन्फ्ल्यूएंझा हा ताप आल्यानं, हा घोड्यांचा बाजारच भरवायचा नाही असा फतवा काढला होता. पण स्थानिकांनी या शासकीय उपद्रवाला कडाडून विरोध केलाय. ' ही आमची परंपरा आहे आणि दुसरीकडेकुठेतरी हे झालं म्हणून इथे बंदी हे आम्ही चालू देणार नाही ' , असं जि.प.सदस्य जयपाल रावल यांनी सांगितलं.अखेर ग्रामपंचायतीचा ठराव, नागरिकांचा विरोध यापुढे शासनाच्या कागदी घोड्यांना मान तुकवावीच लागली. सारंगखेड ग्रामपंचायतीला निव्वळ करापोटी लक्षावधी रुपये मिळतात पण फक्त व्यक्तिगत पातळीवरचे होणारे हे प्रयत्न सोडले तर शासनाकडून याला प्रोत्साहन असं काहीच मिळत नाही. राजकारण्याच्या सत्तासंघर्षाला ' घोडेबाजाराचं ' नाव देऊन खरं तर या इमानी जनावराला बदनाम केलं जातंय. सारंगखेडचा हा बाजार राजस्थानच्या पुष्कर मेळ्याप्रमाणे जगभर न्यायचा असेल तर खूप काही करणं गरजेचं आहे. नुसतं भीमथडीच्या तट्टाणाला यमुनेचं पाणी पाजा, असं म्हणून काही होणार नाही. त्यासाठी ठोस अशा सुविधा पुरवणं गरजेचं आहे. हे खरंय की शासनानं या बाजाराला प्रोत्साहन दिलं. सातपुडा, सह्याद्रीवर घोडेसफारी सुरु केली. घोड्यांचे खेळ अशा गोष्टींना मदत केली तर सारंगखेडचा हा बाजार जगभरात एक पर्यटनाचं आकर्षण बनू शकतं. पण गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळापासून सारंगखेडला घोडे विक्रीसाठी आणणारे ठाकूर अर्जुनसिंग यांचा अनुभव अगदी वाईट आहे. ठाकूर अर्जुनसिंग थेट आग्राहून आले आहेत. 80 वर्षांचे अर्जुनसिंग यांची मुलं वकील आहेत. पण घोड्यांवर मनापासून प्रेम करणारे अर्जुनसिंग यांना भारतभर चांगल्या प्रतीचे घोडे शोधत फिरायचा नाद काही सोडवत नाही. यावेळी त्यांनी तेवीस घोडे आणलेत. अस्सल पंजाबी नस्ल चे आहेत. 'आम्ही ठिकठिकाणी विक्रीसाठी घोडे नेतो. सारंगखेडला 50 वर्षांपासून येतोय. पण कुठेही, केव्हाही पैसे द्यावे लागतात. ड्रायव्हर आणि व्यापार्‍यांना पोलीस दमदाटी करुन पैसे घेतात ', असं अर्जुनसिंग यांनी सांगितलं. रात्रीच्या वेळीही या बाजारातील व्यवहार काही थांबत नाही. रात्रीच्या वेळीही सौदे, देवाणघेवाण, अश्वपरिक्षा हे चालूच असतं.सारंगखेडच्या बाजारात सर्वसामान्य टांगेवाल्यांपासून ते अगदी राजघराण्यांपर्यंत सर्वच जण येतात. उपजिविकेपासून ते मर्दानी हौसेसाठी घोडा या सर्वांनाच हवाय. पण चांगला, सुलक्षणी घोडा निवडणं, तितकसं सोप नाही. ताठ मान, काळं खूर, रूंद पाठ, एकमेकाला जुळणारे कान ही प्रथमदर्शनी दिसणारी उत्तम अंग लक्षणं. पण त्यांच्या जातीवर म्हणजे 'नस्ल' वर त्यांचा स्वभाव अवलंबून असतो. बारीक डोळे, छोटे कान आणि मोठ्या नाकपुड्या असलेला काठेवाडी घोडा अत्यंत तापट. घोड्यांच्या या इमानी स्वभावामुळेच ही माणसं ही त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी आहेत. यात अशीही माणसं आहेत की ज्यांची मूळ आवड कुठली दुसरीच होती. पण आता मात्र ती घोड्यांना खूपच जीव लावतात. फलटणचे संस्थानिक निंबाळकर गेल्या पाच वर्षांपासून सारंगखेडला येतात आणि आता त्यांच्या स्वत:च्या पागेत त्यांनी तब्बल सोळा घोडे बाळगलेत. साधारणपणे आपल्याला घोडा हा वाळवंटात धावणारा, डोंगरदर्‍यात दोडणारा, पाण्यात पोहणारा असा अतिशय शक्तिशाली प्राणी वाटत असला तरी काही बाबतीत अगदी नाजूक आणि भावनाप्रधानही आहे. घोड्याला वाढवताना, पोसताना त्याच्या या नाजूक गोष्टी खूपच काळजीपूर्वक सांभाळाव्या लागतात. सारंगखेड्याच्या बाजाराची ही खासियतच आहे की इथे फक्त घोडे विकले जात नाहीत, तर ते जपायचे कसे, पोसायचे कसे, वाढवायचे कसे याबरोबर ते चालवायचे कसे, हे पण दाखवलं जातं. विकत घेणार्‍याला अंगलक्षणांवरुन एकदा घोडा पसंत पडला की त्याला दावणीतून मोकळं करून पहिलं चालवलं जातं. त्याची चाल दाखवून मग त्याच्यावर रपेट करुन दाखवली जाते. यात घोडयावर चढल्याबरोबर तो पहिलं मागे सरकतो का पुढे हे बघितलं जातं. घोडा मागे सरकला तर अंग लक्षणं कितीही चांगली असो, त्याची किंमत कमी होते. सारंगखेडच्या बाजारात असे हजारो घोडे आणि तितकेच दर्दी असे हजारो अश्वप्रेमी बघायला मिळतात. घोड्यांवर प्रेम करणारी ही माणसंच महाराष्ट्राची मर्दानी परंपरा टिकवून आहेत.सारंगखेडचा हा बाजार 400 वर्षांपेक्षा समृद्ध. ही ऐतिहासिक संस्कृती जागतिक पर्यटकांसाठी एक आकर्षण केंद्र बनू शकतं. पण त्यासाठी या अस्सल भारतीय नस्लच्या या रुबाबदार घोड्यांवर जीवलग सवंगड्यासारखं प्रेम करता आलं पाहिजे. सारंगखेडच्या बाजारपेठेच्या अडीच घरातून हा घोडा जगाच्या पटावर आणता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांच्या अश्वप्रेमाचीही जाणीव आपण ठेवायला हवी. तरंच भीमथडीच्या या तट्टांना अगदी थेम्स नदीचंही पाणी पाजता येईल.

To view this film, visit : http://www.ibnlokmat.tv/showvideo.php?id=31651

No comments:

Post a Comment